Saturday, November 6, 2010

शोध


तुला माहित नसेल हे...

मी मनाचे कप्पे
बंद करुन ठेवले आहेत
त्यातील अवकाश फक्त
तुझ्याच आठवणींनी व्यापला आहे
तुला माहित नसेल हे

प्रत्येक येणारा श्वास
शरीरभर पसरतो तेव्हा
तो तुझेच गाणे गात असतो
तुला माहित नसेल हे

तुझ्याच विचारात रमत असताना
लवणारी पापणी सुद्धा
सतत तुझेच चिंतन करते
तुला माहित नसेल हे

माझ्या शरीरावरील प्रत्येक पेशी
तुला बघताच झंकारुन उठते
नि डोळ्यातून सूर्यकिरणे पाझरू लागतात
त्यानेच संपूर्ण विश्व प्रकाशमान होते
तुला माहित नसेल हे

तुझे नसणे जेव्हा अश्रूंचा
पूर होवून समुद्र बनते
तेव्हा किना~यावर आदळणा~या लाटा
सतत तुझेच नामस्मरण करतात
तुला माहित नसेल हे

जेव्हा तु खळाळून हसतेस
नि माझे कान तो नाद प्राशन करतात
तेव्हा पक्षांचा कोलाहल सर्वदूर पसरतो
आणि झाडांची सळसळ आसमंतात विरते

हे सारे मी अनुभवतो तर्कापलिकडले
पण तुला माहित नसेल हे...


वस्त्रे

जशी वस्त्रे बदलावी कैकदा
तशी बदलतात घट्ट नातीही

अर्थ काही केल्या लावता येत नाहीत
काही अर्थपूर्ण घटनांच्या तपशिलांचा

उमजते अचानकच की पिंपळपानालाही
जाळीदार बनण्यासाठी
झाडापासून विलग व्हावं लागतंच ना
तसाच आपल्या आयुष्याच्या
पिंपळपानाचा प्रवास असावा कदाचित

तुझ्यामुळेच घडलोय मी
हे नाकारणार नाहीच कधी
तसेच तू माझ्यावरचा
अधिकार सोडून दिला आहेस कधीचाच

मी मात्र बुडालोय
त्या जुन्या भासमान सत्याच्या भोव~यात
या भ्रमात की कालचक्र उलटे फिरेल
नि आपण भेटू नवीन उल्हासाने

विणताना नात्याचा गोफ घट्ट विणेचा -
उरतातच काही नाती
जी आपल्या आत्म्याच्या पटलावर ठसतात
नि सोबत करतात जन्मानुजन्मे
एका शरीरानंतर दुस~या शरीराचे
वस्त्र बदलत युगान्तापर्यंत...



शोध

मोजता येतात तारखा
पण थांबवता येत नाही
काळाचा उसळता प्रवाह

शोधता येतात चेहरे आपल्यांचे गर्दीत
पण कळत नाही कधीच
आपल्यांचे आपले न होता गर्दीत मिसळणे

सागरात ओंडके एकत्र येतात
नि काही काळानंतर कायमचे विलग होतात
तसेच आपलेही एकत्र येणे आणि दुरावणे असेल कदाचित

किती तो खटाटोप आपले काही असण्या
अथवा काही नसण्या बद्दलचा
हे विसरुन की आहेत मोजकेच श्वास प्रत्येकाला
उरी आपापली सुख-दुःखं बाळगत

जगरहाटी थांबत नाही कोणासाठीच
तीळ तीळ जीव तुटत राह्तो आपला
श्वास-उश्वासाची साखळी विस्तारत जाते
आणि बंदिस्त शरीरात आपण आपल्या
आठवणी घोळवत राहतो अनाहूतपणे सतत एकटेच

आयुष्याचा थांग लागणे अवघड....
जशी वा~याची मंद झुळूक
मुठीत पकडण्याचा प्रयत्न करावा
आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटावी
अथवा प्रेमाच्या अनंत आयामांना
आपल्या बुद्धिच्या चौकटीत
बंदिस्त करण्याची गुस्ताखी करावी

नि हे सगळं जाणतो मी म्हणत
क्षणोक्षणी पुन्हा पुन्हा सतत
तुला विसरण्याचा प्रयत्न करावा
आणि आपसूकच शोध चालू करावा
स्वतःचाच नव्याने
तुझ्या आठवणींच्या प्रकाशात...


तुझा मार्ग

तुला माझ्यासोबत चलायचे आहे का?
अनेक रस्ते मोकळे असतात चालण्यापूर्वी

पण एकदा पाऊल पुढे टाकल्यावर
पुन्हा मागे फिरता येत नाही
सोबत करतात फ़क्त आठवणी

तुझ्या बरोबरचा कोणताही मार्ग
चालायची माझी तयारी आहे-
काटेरी असो किंवा राजमार्ग
माझ्या काहीही अटी नाहीत
या पूर्वीही माझे पाय रक्ताळून बरे झालेत

फुलांनाही कोमेजावं लागतं कधी न कधी
हे काय ठाऊक नाही तुला?
तसेच आपलेही श्वास थोडकेच ना?
आजचं मरण उद्यावर एवढेच
ते तरी सुसह्य करुया ना

प्रकाश अस्तित्वात आहे म्हणजेच
अंधाराचे न असणे होय
तसेच प्रेमाचे अस्तित्व असणे म्हणजेच
दुःखाचे न असणे होय

म्हणून आजच ठरव "तुझा मार्ग"
"माझ्यासकट" वा" माझ्याविना"


ओळख

मी स्तब्ध होतो क्षणभर
ऋतू बदलतो आपली कूस
प्रत्येक क्षण तुझी आराधना करतो
निसर्गाचा पट उलगडत जातो

तू सामोरी येतेस
अर्थगर्भ जाणिवा विसावतात
मनातील घालमेल संपते
आणि अचानकच आभाळ निरभ्र होते

तू तर काहीच बोलत नाहीस
पण तरीही बरेच काही बोलून जातेस
मी तुझ्या गूढ वागण्याचा अर्थ लावतो
पण हाती काहीच लागत नाही

जेव्हा तू बोलतेस तसे वाटत राहते
अजून खूप काही बोलायचे राहीलेच आहे
समाधान कशानेच वाटत नाही
तहान काही केल्या मिटत नाही

जेव्हा तू दुरावतेस तेव्हा असे वाटते
की तू सोबतच आहेस
पण तू माझी काळजी बिल्कुल करु नकोस
तुझी अनुपस्थिती आणि माझा एकटेपणा
यांची ओळख अगदी जुनी आहे...


कोण जाणे...

बासरीचा सुरेल आवाज
मी साठवतो ह्र्दयाच्या गाभ्यात
आणि दूर क्षितीजावर
झिळमिळतो संधिप्रकाश

रात्र उमलते
चांदण्यांच्या फुलांची उधळण करते
आकाश उजळते
त्यांच्या किणकिणीने

सारी पृथ्वी लोप पावते
काळाचे गतिमान चक्र विसावते
मुसळधार पाऊस धुवून काढतो झाडं
जी डवरतात काळोखात मूकपणे

नदी दुथडी भरून
नागमोडी वळणांतून मार्गस्थ होते
नि पाणी जमिनीला सुपिक बनवते
पुढे पुढे जात राहते

या भिनलेल्या आसमंतात
मी ही अचानक लुप्त होतो
का कोण जाणे मग मला कसचीच आठवण नाही बोचत
-अगदी तुझी सुद्धा




स्वतंत्रतेची किंमत


सर्व नियम सहज ओलांडून
मी तुझ्यापाशी आलो
स्वतंत्रतेच्या महान तत्वाची
ओळख अधरपणे झाली मला

सर्वव्यापी प्रेमानं
मला असे काही लपेटलं
की मला जाणवला
माझाच विस्तार कक्षांपलिकडचा
अव्याहतपणे होत जाणारा

माझा
स्वयंपूर्णतेनं
अल्हाद निर्मिला कधी तू
हे कळालंच नाही मला
कधी तुला काही द्यावे म्हटलं
तर तू अगदी निरिच्छ आभाळासारखी

माझे दोन्ही हात
तुला काहीही देण्यासाठी
फारच लहान पडताहेत
त्यातच तू एकटीच
अनाकलनीय मार्गावरुन जावू इच्छितेस

तुला थांबवण्याचे बल क्षीण होतेय
माझ्यापासून दूर तू पावले टाकत
पाठमोरी चालते आहेस कायमची
नि मार्ग,दिशा यांचा कोलाहल
माझ्या मनात दाटतो आहे
उच्चारलेले शब्द ओठातच आडकताहेत

माझ्यापुढे आहे अनंताचा
प्रवास तुझ्याविना
पण हीच का आहे
आपल्याला मोजावी लागलेली
स्वतंत्रतेची किंमत?


पाठमोरा

कित्येक वर्षांनंतर आज तू अशी समोर उभी
काळ खूप मागे सरलाय
तरीही जुन्या आठवणी अगदी
ताज्या नि ठळक वाटतात मला
जणू सगळं काही कालच घडलंय

खूप काही शिकावं लागलंय
तुझ्याकडून नकळत मला
पण नाही शिकू शकलो
उत्कटतेनं जगलेल्या गोष्टी सहजतेनं विसरणं तुझ्यागत
नि तुझ्या त्या खोट्या शपथा, ती स्वप्नं

वाटले तू काही तर शिकशील माझ्याकडून
ते निःस्वार्थ प्रेम- निरपेक्ष,
ते निसटत्या क्षणांवर जीव ओवाळून टाकणं अकारण,
कधी तुझ्या आठवणीच इतक्या जवळच्या
की तू ही त्यांच्याहून दूर असावीस कदाचित

पण आता तू डोळ्यातले अश्रू
नि मनातला कल्लोळ बनून राहीलीस
भावनांचा बांध फूटू नये म्हणून
मी आटोकाट प्रयत्न करतोय स्वतःवर ताबा ठेवण्याचा
त्यातच तू अचानकच समोर उभी
पाठमोरा उभा राहू दे मला
मला पुन्हा उद्ध्वस्त व्हायचं नाहीये!!!